आर्थिक नुकसान होऊनही प्रशांत कॉर्नरने दिले ३५०हून अधिक कामगारांचे संपूर्ण वेतन
ठाणे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय अचानक जाहीर झाल्याने अनेक छोट्या मोठ्या दुकानदारांना आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यातच मिठाई आणि इतर खाद्य वस्तूच्या दुकानदारांना याचा फटका अधिक प्रमाणात बसला. ठाणे शहरात सहा शाखा असणारे ‘प्रशांत कार्नर’लाही यामुळे प्रचंड आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला. मात्र अशाही परिस्थितीत प्रशांत कॉर्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी आपल्या सर्व कामगारांना त्यांचे पूर्ण वेतन दिल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण होते.
प्रशांत कॉर्नरच्या सहाही दुकानांमधील काही लाख रुपयांची तयार मिठाई आणि मिठाईसाठी लागणारा कच्चा माल खराब झाल्याचे प्रशांत कार्नरचे मालक प्रशांत सकपाळ यांनी सांगितले. या दुकानांत तसेच मिठाई बनवण्याच्या कामासाठी ३५०हून अधिक कामगार आहेत. टाळेबंदीमुळे या कामगारांचे काम बंद झाले होते. मात्र शासनाने आवाहन केल्यानंतर सामाजिक बांधिलकी जपत या सर्व कामगारांना पूर्ण वेतन देण्यात आले तसेच यापैकी शंभरहून अधिक कामगारांना त्यांच्या मूळ गावी बसची व्यवस्था करून पाठवले असल्याचेही त्यांनी सांगितले.
गेली अनेक वर्षे कामगार आपल्याकडे काम करत असल्याने ते टाळेबंदीनंतर परत येतील, अशी अपेक्षा सपकाळ यांनी व्यक्त केली. करोनामुळे नागरिक जागरूक झाले असल्याने सध्या बहुतांश ग्राहक हे ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे येत्या काळात ऑनलाइन व्यवसायावर अधिक भर देणार असल्याचे सपकाळ म्हणाले. टाळेबंदीच्या या काळातील कर्जावरील किमान व्याज सरकारने माफ केल्यास व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल, अशी मागणीही त्यांनी केली.
0 टिप्पण्या