वस्तुंच्या निर्जंतुकीकरणासाठी खास सॅनिटायझेशन कॅबिनेट
औरंगाबाद
औरंगाबादच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयात बीई केमिकल केलेले विलास व्यवहारे यांचा पारंपरिक खाद्यतेल विक्रीचा व्यवसाय आहे. लॉकडाऊनमध्येही अत्यावश्यक सेवेत असल्याने तेलाची विक्री सुरू आहे. दुकानात दररोज मोठ्या प्रमाणात नोटा येतात. त्यांचे निर्जंतुकीकरण कसे करायचे, हा त्यांना प्रश्न पडला. यासाठी इंटरनेटवर शोध घेतला असता आयआयटी गुवाहाटीचा यूव्ही रोबोटची माहिती मिळाली. त्या तंत्रज्ञानाचा आधार घेत अभियंता विलास व्यवहारे यांनी अशा वस्तुंच्या निर्जंतुकीकरणासाठी खास सॅनिटायझेशन कॅबिनेट तयार केले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाने सारे जग चिंतीत असतानाच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी तासातासाला हात धुणे, कोमट पाण्याने भाज्या स्वच्छ करणे घराघरात सुरू आहे. मात्र, पाण्याने धुणे शक्य नसलेल्या मोबाइल, वॉलेट, नोटा, किल्ली आदीचे निर्जंतुकीकरण कसे करायचे हा प्रश्न उभा राहतो. अल्ट्रा व्हायोलेट म्हणजेच अतिनील किरणांच्या माऱ्याने या वस्तू विषाणुमुक्त होतात. कोरोनाचा विषाणू वेगवेगळ्या वस्तूंवर जिवंत राहतो. यामुळे घरात येताच हात धुणे तसेच या घराबाहेर वापरलेल्या वस्तूंचे निर्जंतुकीकरण करणे अपरिहार्य ठरत आहे.त्यासाठी व्यवहारे यांनी ही कॅॅबिनेट तयार केली आहे.
दुकानांत चॉकलेट डिस्प्लेसाठी असणाऱ्या कॅबिनेटमध्ये ११ वॅटची फिलिप्सची यूव्ही ट्यूब बसवली. तिला ड्रायव्हर आणि २४ व्होल्टचा डीसी पाॅवर सप्लाय देण्यात आला. एफएमचा जुना बॉक्स केसिंगसाठी वापरला. ट्यूबच्या प्रकाशात २० मिनिटे मोबाइल, नोटा, किल्ली, पाकीट, चश्मा, घड्याळ, रुमाल किंवा अन्य कोणतेही साहित्य ठेवल्यास ते निर्जंतुक होते. १० तास ट्यूब चालवण्यासाठी एक युनिट वीज लागते. यासाठी १२०० रुपये खर्च आला. हे साहित्य घरातच असल्याने प्रयोग शक्य झाला. याची माहिती काही कंपन्यांपर्यंत पोहोचली. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या साहित्यासाठी याची मागणीही नोंदवली आहे.
0 टिप्पण्या