या प्रकरणाला धर्माशी जोडून आग लावण्याची कामं करु नका - मुख्यमंत्री
मुंबई
दोघा साधूंची हत्या झाल्याचे प्रकरणाने महाराष्ट्रात राजकारण चांगलंच तापत आहे. पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावाकडून घडलेल्या हत्या प्रकरणी भाजपने राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचे पडसाद देशभरात उमटलेले असून भाजप नेत्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीकेची राळ उठवली आहे. गौतम गंभीर, बबिता फोगट, आमदार राम कदम यांनीही सरकारवर टीका केली आहे. सोमवारी जनतेशी संवाद साधताना महाराष्ट्र सरकार कोणत्याही आरोपीला सोडणार नाही, सर्वांना कठोर शिक्षा होईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे
या प्रकारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी जनतेशी संवाद साधत पालघर प्रकरणावर राज्य सरकारची बाजू स्पष्ट केली. या प्रकरणाला सांप्रदायिकता किंवा धर्माशी जोडून आग लावण्याची कामं करु नका. CID DG Crime अतुल कुलकर्णी या घटनेचा तपास करत असून प्रमुख पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. घडलेली घटना ही दुर्दैवी असून सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास सोपवला असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींना अटक केली असून काही आरोपींचा शोध आहे.
गडचिंचले हे गाव पालघर जिल्ह्यात अत्यंत दुर्गम भागात आहे. आजही या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. गेले काही दिवस या भागात रात्रीचे चोर फिरतात ही अफवा पसरवली जात आहे. मृत्यूमुखी पडलेले साधू हे गुजरातला जात असताना, त्यांना दादरा-नगर हवेली परिसरातून परत पाठवण्यात आलं. यावेळी परतताना गैरसमजातून साधूंवर हल्ला झाला आणि त्यात त्यांचा जीव गेल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
0 टिप्पण्या