काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुले पत्र..
माननीय पंतप्रधानांकडे आग्रहाची मागणी...
कृपया दूरदर्शनवरील आपल्या प्रचाराचा दर्जा सुधारा...
मुंबई
कोरोनासारखी भीषण जागतिक महामारी सुरू आहे. जगातील इतर देशांप्रमाणेच भारतातही अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोट्यवधी लोक बेरोजगार झाले आहेत. उद्योगधंदे ठप्प पडून प्रचंड आर्थिक मंदीची चिन्हे आहेत. या भयावह संकटाने जनतेत असहाय्यतेची भावना निर्माण झाली आहे. या अंधकारमय भविष्याच्या छायेत आपणांसारखा तारणहार 'मसिहा' या देशाचे नेतृत्व करतो आहे, हे सिद्ध करण्याची ही एक नामी संधी आहे. कोरोनाच्या या संकटात तुम्ही माझ्यामुळेच जीवंत आहात, हे लोकांना सांगण्याची ही संधी आपण दवडता कामा नये. कदाचित म्हणूनच या जीवघेण्या आपत्तीत आपण दूरदर्शनच्या माध्यमातून २०२४ च्या प्रचारमोहिमेचा नारळ फोडला असण्याची शंका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.
आपल्या पत्रात त्यासाठी मोदींचे त्रिवार अभिनंदन आणि आपल्या देवतुल्य नेतृत्वाचे आभार मानण्याची संधी पामर जनतेला दिल्याबद्दल मानाचा मुजराही केला आहे. आपल्या पत्रात सावंत पुढे लिहितात, कोरोनासारख्या जागतिक महामारीत प्रचारमोहीम राबवल्याबद्दल कदाचित अनेक जण टीकाही करतील. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. डगमगून जाऊ नका. स्टंट, इव्हेंट आणि जाहिरातबाजी हीच तर आपली मूळ धोरणं आणि तत्व आहेत. कितीही विपरित परिस्थिती ओढवली तरी मूळ धोरणं आणि तत्व कधीही सोडायची नसतात, हे आपण दाखवून दिलं आहे. सत्ताकारणात स्टंट, इव्हेंट आणि जाहिराती किती महत्वाच्या असतात, हे इतरांना काय कळणार?
दुसरी महत्वाची बाब म्हणजे या जगात कोणीही परिपूर्ण नसतो. आपल्यात एखादी उणीव असेल तर ती आपल्याकडील अन्य कौशल्यांच्या आधारे भरून काढली पाहिजे. त्यात काहीच गैर नाही. त्याप्रमाणे तुमच्या सरकारकडे जाण, दूरदृष्टी, कर्तृत्वाची कमतरता आहे आणि ही उणीव स्टंट, इव्हेंट व जाहिरातींबाबत असलेल्या कौशल्याच्या मदतीने भरून काढली जात असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे.
महिलांच्या जनधन खात्यात ५०० रूपये जमा करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे आपला कसा फायदा झाला, ते सांगणाऱ्या गरीब लाभार्थी महिलांच्या प्रतिक्रिया सध्या दूरदर्शनवर प्रसारित केल्या जात आहेत. ते व्हीडीओ आणि ‘I am thankful to PM’ अशा आपल्याला श्रेय देणाऱ्या (जो आपला मूळ आणि एकमेव उदात्त हेतू आहे) शब्दांनी सुरूवात होणारा चित्ताकर्षक मजकूर दूरदर्शनकडून ट्वीट केला जातो आहे. देशभरातील आपले भाविक भक्त हेच व्हिडिओ आणि मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करून आपलं अद्वितीय कार्य सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य इमाने इतबारे करीत आहेत.
परंतु, कोरोनासंदर्भातील या जाहिरातबाजीमध्ये काही गंभीर चुका दिसून आल्या आहेत. त्या चुकांमुळे प्रसिद्धीच्या मूळ हेतुलाच मोठा धक्का बसतो आहे. दूरदर्शन हे सरकारी माध्यम आहे. त्यासाठी सरकारी तिजोरीतून खर्च केला जातो. त्यामुळे आपल्या प्रसिद्धीसाठी जनतेच्या पैशातून होणारी ही जाहिरातबाजी बिनचूक असावी, अशी एक सामान्य करदाता म्हणून माझी अपेक्षा आहे. मात्र दूरदर्शनच्या कामचुकार अधिकाऱ्यांना ना आपल्या उदात्त हेतूची जाणीव आहे, ना जनतेच्या पैशांची पर्वा! त्यामुळे या जाहिरातींमध्ये मी पुढीलप्रमाणे काही दुरूस्त्या सूचवत आहे. कृपया त्यावर गांभिर्याने विचार व्हावा, ही विनंती.
केंद्र सरकारने ५०० रूपये पाठवल्याने आमच्या संसाराला मोठा आधार मिळाला, हे सांगण्यासाठी दूरदर्शनने ज्या महिला निवडल्या आहेत, त्यांची एकंदर परिस्थिती पाहता त्यांना ५०० रूपयांनी फार फरक पडत असेल, असे वाटत नाही. कारण एका महिलेच्या घरात चक्क Fire Extinguisher लागलं आहे. तो काढून टाकून सदर व्हिडिओ पुन्हा रेकॉर्ड करावा. लोकांमध्ये उगाच चर्चा व्हायला नको. एका महिलेच्या गळ्यात चांगली लांबलचक सोन्याची चेन दिसते आहे. ती चेन खोटी आहे, असा डिस्क्लेमर खाली स्क्रोलमध्ये टाकायला हवा होता. एवढी साधी बाब दूरदर्शनला कशी कळत नाही, याचंच आश्चर्य आहे.
केंद्राच्या मदतीमुळे मी सिलिंडर घेऊ शकले, असं सांगणाऱ्या महिलेच्या स्वयंपाकघरात गोवर्धन घी, ब्रॅंडेड लोणचे, सॉसची बाटली दिसते आहे. विकतचे तूप, लोणचे आणि सॉस वापरणारी महिला एक अनुदानित सिलिंडर घेऊ शकत नाही, यावर जनतेचा विश्वास कसा बसेल? त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपले एक भावनिक निवेदन जोडावे. आपण ५०० रूपये दिले नसते तर त्या सुखवस्तू कुटुंबातील भगिनीला सिलिंडर घेताच आले नसते, हे पटवून देण्याचं काम फक्त आपल्या शाब्दिक वाकबगारीनेच शक्य होऊ शकेल.
एका व्हिडिओमध्ये महिला बोलत असताना पाठीमागे दारात उभी असलेली मुलगी अचानक अदृश्य होते. त्यातून काही लोकांना ही एक उत्स्फूर्त प्रतिक्रिया नसून, ते scriptedआणि edited असल्याचं वाटेल. काही लोक मोदीजींमुळे काळी जादू होते किंवा ही एखाद्या हॉरर चित्रपटातील दृश्ये आहेत, अशीही अफवा पसरवतील. अशा नतद्रष्टांना तोंड उघडण्याची संधी आपण का द्यावी? त्यामुळे तिथेही काही तरी दुरूस्ती करा.
अन्य एका जाहिरातीत तर दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांनी हद्दच केली आहे. एसटी स्टॅंडपासून विमानतळापर्यंत अन् शौचालयापासून एटीएमपर्यंत सर्वत्र आपली सुहास्यवदनी छवी झळकावी, यासाठी आपण जीवाचे रान करीत असताना दूरदर्शनने मात्र एका जाहिरातीत चक्क लाभार्थीच्या मागे दिसणारे आपले पोस्टर जाणीवपूर्वक धूसर केले आहे. आपल्याच जाहिरातीत आपलेच पोस्टर धूसर करण्याची हिमाकत म्हणजे अतीच झाले! कृपया आपण दूरदर्शनला तो ओरिजिनल व्हिडिओ वापरून ते पोस्टर जनतेला ठळकपणे दिसेल, याची तजवीज करावी
मोदीजी, दूरदर्शनच्या या साऱ्या चुकांमुळे या जाहिराती खोट्या आहेत, असा अपप्रचार करण्याची संधी लोकांना मिळते. २०२४ ची ही प्रचारमोहीम अशा प्रकारे बुमरॅंग होणं योग्य नाही. त्यामुळे आपण या गंभीर प्रकरणात लक्ष घालावे. दूरदर्शनच्या अधिकाऱ्यांना तंबी द्यावी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सध्याच्या Art Director ची गच्छंती करून चांगले प्रोफेशनल लोक नेमावेत, अशी आग्रहाची मागणी आहे. मदत ५०० रूपयांची असेल तरी चालेल. पण त्याची जाहिरात ही प्रभावीच झाली पाहिजे. त्यासाठी भलेही ५०० कोटी खर्च झाले तरी चालतील. आपण उगाचच ही महत्वाची जबाबदारी सरकारी एजन्सीला दिली. आपल्या नेहमीच्या खाजगी एजन्सी कुठे गेल्या? असा प्रश्न आम्हाला पडला आहे.
खरे तर आपले इव्हेंट आणि जाहिरातबाजी नेहमीच जागतिक दर्जाची राहिली आहे. आपले हे कसब विरोधकही अगदी जाहीरपणे मान्य करतात. उत्पादन दर्जाहीन असलं तरी जाहिरात व इव्हेंटचा दर्जा चांगला असेल तर ते उत्पादन हातोहात खपू शकते, याचा वस्तुपाठ तुम्ही जगातील अनेक conglomerates ला घालून दिला आहे. यासाठी आपण नक्कीच अभिनंदनास पात्र आहात. लॉकडाऊनमुळे आपण भारतात अडकून पडला आहात. अन्यथा 'कोरोनावरील उपाययोजना व त्याची जाहिरातबाजी' याबाबतच्या hardwork बद्दल Harvard ला जाऊन जगाला शिकवण देण्याची विनंती मी आपणांस केली असती. असा खोचक सल्लाही सावंत यांनी पत्राद्वारे दिला आहे. तसेच पुढील काळातील उपक्रमांसाठी आपणांस खुप-खुप शुभेच्छा. आपल्या नवनवीन जाहिराती, इव्हेंट आणि स्टंट पाहण्यास आम्ही आतूर असल्याचे सावंत यांनी पत्रात शेवटी नमूद केले आहे.
0 टिप्पण्या