राज्यभरातील नागरिकांमध्ये उद्याच्या चिंतेचे वातावरण
ठाणे
कोरोनाच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊनचा वाढवलेला कालावधीमुळे राज्यभरातील नागरिकांमध्ये उद्याच्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या दीड महिन्यात कोविड-१९ विषाणू संसर्गामुळे तयार झालेल्या अनिश्चिततेमुळे भविष्यात उपासमार होऊ नये म्हणून महत्त्वाच्या वस्तूंची अधिकाधिक साठवणूक कशी करता येईल याकडे कल वाढला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ दिला जाणार नाही, हे सरकारचे आश्वासन नागरिकांनी गांभीर्याने घेतलेले नाही. या झुंबडखरेदीचा ताण पुरवठय़ावर, साथनियंत्रणावरही होऊ लागल्यामुळे त्याचे गांभीर्य वाढले आहे.
करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता टाळेबंदी जाहीर करण्यात आली. लोकांनी घरीच थांबावे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर यावे, अशी सूट देण्यात आली होती. त्याचा फायदा घेत लोकांनी घरी लागणाऱ्या वस्तुंचा साठा करण्यासाठी प्रचंड खरेदी सुरु केली. परिणामी खाद्यतेलांची विक्री दुप्पट झाली. राज्यात खाद्यतेलाची दोन महिन्यांपेक्षा जास्त काळात होणारी विक्री गेल्या पाऊण महिन्यात झाल्याचे तेल विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या संघटनेला अनुभवास आले. त्याचबरोबर धान्य आणि किराणामाल नेहमीपेक्षा दुप्पट किंवा तिप्पट प्रमाणात खरेदी करण्यात आला. भाजीपाला खरेदीसाठी ठिकठिकाणी गर्दी झाल्याचे दिसून आले.
नाशिकमधून मुंबई उपनगरात दररोज ६० ते ७० ट्रक रवाना होत आहेत. सध्या मागणी वाढल्याने सरासरी ८० ट्रक रवाना होत आहेत. भावही चांगला मिळत असल्याने भाजीपाला मुंबईत जास्त जातो, असे उत्पादकांकडून सांगण्यात आले. भाजीपाला, धान्य, डाळी, कडधान्ये आदींचा मुबलक पुरवठा सुरू आहे. टाळेबंदीच्या काळातही भाजीपाला आणि धान्याचा साठा राज्यात सर्वत्र वेळेत पोहचण्यासाठी सर्व उपाय योजण्यात येत आहेत. मागणी तसा पुरवठा होत असल्याचे पणन विभागाचे म्हणणे आहे. आवक आणि जावक मालात कु ठेही तुटवडा जाणवत नाही.
धान्याचा मुबलक साठा उपलब्ध असतानाही खरेदीसाठी गर्दी वाढली. घाऊक बाजारात धान्य व किराणा उपलब्ध असला तरी किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानात वाहतूक व्यवस्था बंद असल्याने तो पोहचू शकला नाही. किराणामालाच्या दुकानांमध्ये धान्य नसल्याने लोकांमध्ये भीती पसरली. त्यातून गर्दी वाढली. मागणी वाढल्यावर दर वाढतात हे दुष्टचक्र निर्माण झाले. चॉकलेट्स, बिस्किटे, नूडल्स, पास्ता यांसारख्या झटपट होणाऱ्या पदार्थाची पाकिटे काही ठिकाणी पाच ते दहा पटींनी खरेदी केली जात आहेत. राज्यभरातील कित्येक दुकानांतून नूडल्सची पाकिटे नाहीशी झाली आहेत. सॉस, लोणची, तयार मसाले इतकेच नाही, तर धुण्या-भांडय़ांच्या साबणांची कित्येक भागांत टंचाई झाली इतकी खरेदी लोकांनी केली आहे. परिस्थिती अशीच राहिली तर या वस्तूंपासून वंचित होऊ नये म्हणून मिळतील तेवढय़ा वस्तूंचा साठा नागरिक करीत आहेत.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पालघर या मुंबई महानगर क्षेत्रात पुढील चार महिने पुरेल एवढा धान्यसाठा शिल्लक असून खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी करू नये, असे आवाहन मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे.गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २४ तास दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली आणि तसा आदेश जारी केला. परंतु व्यापाऱ्यांना वेगळा अनुभव आला. सकाळी १० किंवा ११ नंतर दुकाने बंद करण्याची सूचना स्थानिक पातळीवर करण्यात आली. सायंकाळी किराणा मालाची दुकाने उघडण्यावर र्निबधच आहेत. यामुळे २४ तास दुकाने उघडी ठेवण्याच्या शासनाच्या योजनेस अधिकारी किंवा पोलिसांनीच हरताळ फासल्याचे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे.
0 टिप्पण्या