Trending

6/recent/ticker-posts

'अथांग सावरकर' कार्यक्रमाचे ठाणे भाजपकडून आयोजन

'अथांग सावरकर' कार्यक्रमाचे ठाणे भाजपकडून आयोजनठाणे :


मुंबईत स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाने 'अथांग सावरकर' हा कार्यक्रम रद्द केल्यानंतर ठाणे भाजपकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सावरकरांवरून पुन्हा एकदा राजकारण झाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात निर्माते शरद पोंक्षे यांनी यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.  
 स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाने प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यगृहात 'अथांग सावरकर' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मात्र, महासंघाच्या पदाधिकाऱयांची मनोरंजनात्मक कार्यक्रमांची इच्छा असल्यामुळे  कार्यक्रम रद्द केला. तसे शिवसेना उपनेते अभिनेते शरद पोंक्षे यांना पत्र पाठवून कळवले होते. ठाण्यात भाजपतर्फे मराठी भाषा दिन साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमातच भाजपचे शहराध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे यांनी 'अथांग सावरकर' कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला.  डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात 27 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. या कार्यक्रमाला ठाणेकर नागरिकांसह सावरकरप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे.  परंतु या कार्यक्रम बदलास ठाणे भाजपकडून राजकीय वळण देण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. या संदर्भात अभिनेते शरद पोंक्षे यांच्याशी संपर्क साधला असता. एखाद्या ठिकाणचा कार्यक्रम रद्द झाला आणि दुसऱया आयोजकांनी कार्यक्रम आयोजित करण्याची इच्छा दर्शवली तर तो कार्यक्रम केला जातो. एवढेच या घटनेत घडले असून यात कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही, असे पोंक्षे यांनी सांगितले.  
मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही. मी सत्य बोललो मग माफी का मागू, मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे  असे आक्रमक वक्तव्य करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादळ निर्माण केले होते. त्याबाबत नागपूरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनात बरेच रणकंदन झाले होते. आम्हाला सावरकरांविषयी बोलण्यास कोणीही थांबवू शकत नाही, असे म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजपने अधिवेशनात राहुल गांधींच्या माफीची मागणी केली. विधानसभेत फडणवीसांनी सावरकरांबद्दल बोलताना विधानसभा अध्यक्षांनी त्यांचे म्हणने पटलावरुन काढून टाकले. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप विरुद्ध इतर पक्ष असे एकंदरीत चित्र निर्माण झाले आहे.  त्यामुळेच भाजप या कार्यक्रमाद्वारे लोकांमध्ये सावरकरप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा ठाण्यात रंगली आहे.  


Post a Comment

0 Comments